नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्णकर्कश आवाज करणा-या दुचाकींना पोलीसांनी आपल्या रडारवर घेतले असून, चालकांवर कारवाई करीत पोलीसांकडून मॉडीफाईड केलेले सायलेन्सर जप्त केली जात आहे. परिमंडळ १ हद्दीत हस्तगत केलेल १११ सायलेन्सर पोलीसांनी शुक्रवारी (दि.२२) नष्ट केले. यासाठी रोडरोलरचा वापर करण्यात आल्याने सायलेन्सरचा चक्काचुर झाला.
पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांच्या आदेशान्वये १४ ते २१ मार्च दरम्यान परिमंडळ १ अंतर्गत येणा-या पोलीस ठाणे निहाय दुचाकी चालकांवर कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत दुचाकींची तपासणी करण्यात येवून कर्णकर्कश आवाज करणारे मॉडीफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले. आडगाव (८), म्हसरूळ (१४), पंचवटी (११), सरकारवाडा (११),भद्रकाली (१५) मुंबईनाका (२७) व गंगापूर (२५) अशी पोलीस ठाणे निहाय हस्तगत करण्यात आलेल्या सायलेन्सरचा पुन्हा वापर होवू नये यासाठी शुक्रवारी परिमंडळ १ कार्यालयासमोरील आवारात रोडरोलर फिरवून नाश करण्यात आला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.