इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
आज विश्वचषक स्पर्धेत एक मोठा उलटफेअर बघायला मिळाला. गत विजेत्या इंग्लंडचा नवख्या अफगान संघाने ६९ धावांनी पराभव करून विश्वचषकात एकच खळबळ माजवून दिली आहे. फिरकी गोलंदाजीला कायमच अनुकूल असणाऱ्या भारतीय खेळपट्टीवर अफगान संघाचा ऑफ ब्रेक गोलंदाज मुजीब-उर-रहमान आणि लेग स्पिनर – अष्टपैलू रशीद खान या दोघांनी प्रत्येकी ३ बळी घेऊन या सामन्यात इंग्लंडची इंग्लंडला अडचणीत आणले. २८४ या धावसंख्येला उत्तर देताना इंग्लंडचा संघ ४०.३ षटकात अवघ्या २१५ धावांमध्ये गुंडाळला गेला.
आज या दोन्ही संघात दिल्लीतल्या स्व. अरुण जेटली मैदानावर विश्वचषक स्पर्धेचा हा साखळीतला सामना रंगला. नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याने अफगाणिस्तान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीचे फलंदाज रेहमानुल्ला गुरबाझ आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केल्यामुळे अद्याप विश्वविजेत्या असलेल्या इंग्लंड संघाची अडचण वाढली होती. परंतु इब्राहिम — धावांवर रशिदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानंतर इंग्लडच्या जिवात जीव आला. गुरबाझ (५७ चेंडूत ८० धावा) आणि मधल्या फळीतला अलीखिल (६६ चेंडूत ५८ धावा) या दोघानी केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे अफगाण संघाला २८४ धावांचे एक चांगले आव्हान उभे करता आले. अष्टपैलू राशिद खान (२३) आणि मुजिब-उर-रहेमान (२८) यांनी तळाला मजबुती मिळवून दिली.
इंग्लंड तर्फे अदिल राशिदने १० षटकात ४२ धावा देवून ३ बळी घेतले. लिअम लिविंग्स्टनने मात्र आज १० षटकात अवघ्या ३३ धावा देवून १ बळी घेतला आणि अफगाण फलंदाजांना बांधून ठेवले. पहिल्या पॉवर प्लेचा चांगला उपयोग केल्याने अफगाण संघाच्या ५० धावा ६.३ षटकात , १०० धावा १२.४ षटकात तर २५.२ षटकातच १५० धावा पूर्ण झाल्या होत्या. असे अनेक प्रसंग आजच्या या सामन्यात आले जेव्हा विश्वविजेता इंग्लंड संघ नवख्या अफगाण संघासमोर अडचणीत येतो की काय ? अशी शंका घ्यायला जागा निर्माण झाली होती आणि अखेरीस इंग्लंडला सावरण्याची संधी न मिळाल्याने अखेर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.मुजीब-उर-रहमानला प्लेयर ऑफ द मॅच हा सन्मान देण्यात आला.
उद्या लखनऊ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळला जाईल.
या दोन्ही संघांनी अद्याप आपले विजयाचे खाते उघडलेले नाही.