नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन जणांना आठवडे बाजारात बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी सात वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. या खटल्यातील चार जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने बनावट नोटा तयार करून आरोपींनी भारतीय अर्थव्यवस्थेला तडा जाईल असा गुन्हा केल्याचे संबोधले आहे.
हरिष वाल्मिक गुजर (२९ रा.विंचूररोड,येवला), बाबासाहेब भास्कर सैद (३८ रा. चिचोंडी खु. ता.येवला),आनंदा दौलत कुंभार्डे (३५ रा. पन्हाळे ता.चांदवड) व किरण बाळासाहेब गिरमे (४५ रा. पोतनीस पार्क विंचूर,ता.निफाड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या खटल्यात अक्षय उदयसिंग राजपूत, प्रकाश रमेश पिंपळे व राहूल चिंतामण बडोदे आदींची न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे ६ सप्टेंबर २०२१ रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. आठवडे बाजारात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न झाला होता. भाजीपाला विक्रेत्या महिलेच्या ही बाब निदर्शनास आल्याने याप्रकरणी सुरगाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक निलेश बोडके यांनी केला. पोलीसांनी विंचूरसह विविध ठिकाणी छापे टाकत आरोपींना बेड्या ठोकत पुराव्यासह दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले होते.
हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधिश कोर्ट क्र.११ चे न्या. डॉ. उमेशचंद्र मोरे यांच्या समोर चालला. सरकार तर्फे अॅड. रविंद्र निकम यांनी प्रभावी बाजू मांडली. आठ साक्षीदार तपासतांना त्यांनी सदरचा अपराध देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बाधा निर्माण करणारा असल्याचे पटवून दिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून चार आरोपींना सात वर्ष सक्तमजूरी व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या निकालपत्रात न्यायालयानेही बनावट नोटा तयार करून आरोपींनी भारतीय अर्थव्यवस्थेला तडा जाईल असा गुन्हा केल्याची नोंद केली आहे. पैरवी अधिकारी म्हणून अभियोग कक्षाचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी काम पाहिले.