नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये मधील ४० टक्के कांदा निर्यात शुल्क ऑक्टोबर मधील ८०० डॉलर किमान निर्यात मूल्य व ७ डिसेंबर पासून शंभर टक्के कांदा निर्यात बंदी केली होती. ३१ मार्चला कांदा निर्यात खुली होणे अपेक्षित असताना केंद्रीय व्यापार विभागाचे संचालक संतोष कुमार सारंगी यांच्या सहीने काल २२ मार्च रोजी एक परिपत्रक काढले असून त्यामध्ये पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम असेल असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे मागील सहा महिन्यांत कांदा उत्पादकांचे काही हजारो कोटींचे नुकसान झाल्यानंतर यापुढेही कांद्याची दर घसरण सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांचे आणखी कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने कुठल्याही अटी शर्ती शिवाय कांद्याची निर्यात खुली करावी अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांकडून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यातून सत्ताधाऱ्यांना मतदानातून याचे उत्तर दिले जाईल असा इशारा महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.