नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट सही करून नोकरदार महिलेच्या बँक खात्यातून भामट्यांनी १ लाख ६५ हजाराची रक्कम लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीबीएस परिसरातील एका को – ऑप बँकेत घडली असून ,बँकेकडून चौकशीस टाळाटाळ झाल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमन उत्तेकर (रा.पेठरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. उत्तेकर या एका शाळेत सेविका म्हणून कार्यरत आहेत. शाळेकडून संबधीत बँकेच्या सिबीएस शाखेत त्यांचा पगार जमा केला जातो. चार महिन्यांपूर्वी बँक खात्यातून त्यांनी काही रक्कम काढली होती. यावेळी त्यांनी पासबुक भरूण घेतले असता खात्यात रक्कम कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्रिंट मारून घेतलेल्या पुस्तकात ५ मार्च २० ते १५ डिसेंबर २०२२ दरम्यान बँक खात्यातील तब्बल १ लाख ६५ हजाराची रक्कमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी बँकेकडे चौकशी केली बनावट साक्षरीद्वारे पैसे काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने सीसीटिव्ही यंत्रणेच्या पाहणीसह चौकशी करण्याची ग्वाही देण्यात आली. मात्र रकमेबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.