नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बसप्रवासात महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी रोकडसह दागिणे हातोहात लांबविल्याची घटना गोंदे फाटा ते वाडिव-हे दरम्यान घडली. याप्रकरणी सहप्रवासी असलेल्या अज्ञात भामट्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो इंदिरानगर पोलीसांनी वाडिव-हे पोलीसांकडे वर्ग केला आहे.
स्मिता प्रफुल्ल पितळे (रा. आव्हाडमळा,चेतनानगर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पितळे या गेल्या सोमवारी (दि.११) टिटवाळा येथे जाण्यासाठी महामार्गा वरील गरवारे पॉईट येथून बसमध्ये बसल्या होत्या. गोंदे फाटा ते वाडिव-हे दरम्यानच्या बसप्रवासात ही चोरी झाली. वाडिव-हे येथे उतरलेल्या अज्ञात सहप्रवासी महिलेने त्यांच्या पर्सची चैन उघडून तीन हजाराच्या रोकडसह दागिण्यांवर डल्ला मारला. या घटनेत सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरीस गेला असून अधिक तपास वाडिव-हे पोलीस करीत आहे.
गावठी पिस्तूल बाळगणा-याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निलगिरीबाग परिसरातील म्हाडा कॉलनी भागात गावठी पिस्तूल बाळगणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून पिस्तूलसह तीन जीवंत काडतुस असा सुमारे ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्र्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन उर्फ बाले भागवत काळे (४० रा. भिमनगर हौ.सोसा.जेलरोड) असे अटक केलेल्या पिस्तूलधारीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे यांनी फिर्याद दिली आहे. निलगिरीबाग भागातील म्हाडा कॉलनी परिसरात एका तरूणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार गुरूवारी (दि.२१) पोलीसांनी धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या असता त्याच्या अंगझडतीत पिस्तल व जीवंत काडतुसे असा सुमारे ४० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. अधिक तपास उपनिरीक्षक दाईगडे करीत आहेत.