इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेःराज्यातील शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. सत्ताधारी पक्षातील एका व्यक्तीने आपल्याला ११ फाईल पाठवल्या आहेत, असे सांगत त्यांनी काही कागदपत्रे सादर केली.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दोनशे मिलीलीटर दूध पुरवले जाते. या दूध पुरवठ्यासाठीचा पहिला करार २०१९ मध्ये झाला आहे. या करारात दुधाचा दर ४६.४९ रुपये होता. चितळे, महानंद, अमूल दूधाचे दर ४९.७५ रुपये होते, असे निदर्शनास आणून ते म्हणाले, कती २०२३-२४ मध्ये मात्र हा दर १४६ रुपये झाला आहे. १६४ कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. एवढ्या महागड्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी दूध खरेदी केली जात आहे. यामध्ये ऐंशी कोटी रुपयांचे कमिशन दिले गेले आहे’, असा गंभीर आरोप आ. पवार यांनी केला.
संबंधित घोटाळ्याप्रकरणी आपण तक्रार करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, की शेतकऱ्याकडून तीस रुपये दराने घेतलेले दूध गरीबांच्या मुलांना १४६ रुपये दराने दिले जात आहे. या विरोधात पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि लाचलुचपत विभागाकडे तक्रार देणार आहे. आंबेगाव तालुक्यातील खासगी दूध डेअरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याच्या दूध संघाला हे काम दिले आहे’, असे त्यांनी निदर्शनास आणले.