नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सह जिल्हा निबंधक वर्ग १ व मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक या कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालये ही दि. २३ व २४ मार्च तसेच दिनांक २९ ते ३१ मार्च या शासकीय सुटींच्या दिवशी इतर कामकाजाच्या दिवसांप्रमाणे विहित केलेल्या वेळेत सूरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक (वर्ग १) कैलास दवंगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबतच्या आदेशात म्हटले आहे कि, वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते दि. १ एप्रिल रोजी प्रसिध्द होत असल्याने तसेच माहे मार्च २०२४ अखेर (आर्थिक वर्ष संपत असल्यामूळे) बहुतांश कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते.
त्या अनुषंगाने आर्थिक वर्ष सन २०२३ – २०२४ या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी व दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची वाढती गर्दी, व्यावसायिक संघटना, जनतेच्या व कार्यालयांची मागणी विचारात घेता, वरिष्ठ कार्यालयांच्या निर्देशानुसार सह जिल्हा निबंधक वर्ग १ व मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक या कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालये ही दिनांक २३ व २४ मार्च तसेच दिनांक २९ ते ३१ मार्च या शासकीय सुटींच्या दिवशी इतर कामकाजाच्या दिवसांप्रमाणे विहीत केलेल्या वेळेत सूरू ठेवण्यात येणार आहेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.