नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शनिवार व रविवारी २३ व २४ मार्च २०२४ या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार असून या सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यासोबतच थकीत वीजबिल वसुलीसाठीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्या विदुयत बिलाचा भरणा वेळेत करावा. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँप (App) वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते.
याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते, या डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या वीजबिल भरता येईल. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.