इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – हवामान बदलाचे संकट थोपविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठीची ‘नेट झिरो’ ही मोहिम उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. मराठमोळे ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या पुढाकारामुळे भारताच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. या मोहिमेमुळे भारताने एक पाऊल पुढे टाकत जगातील अनेक देशांपुढे आदर्श निर्माण केला आहे. तसेच नजिकच्या काळात अन्य देशांच्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ही मोहिम राबविली जाण्याची दाट चिन्हे आहेत.
शांतता नोबेल विजेत्या आयपीसीसी अहवाल २००७चे समन्वयक प्रमुख सहलेखक, युनेपचे माजी संचालक आणि वैश्विक ओझोन कृती समितीचे माजी प्रमुख असलेल्या डॉ. राजेंद्र शेंडे यांनी ग्रीन तेर फाऊंडेशनच्या माध्यमातून जगभरात नेट झिरो ही चळवळ उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उभारली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील ५००हून अधिक विद्यापीठे, शेकडो महाविद्यालये, आयआयटीसारख्या नामांकीत संस्था सहभागी झाल्या आहेत. याद्वारे देशातील जवळपास १ लाख विद्यार्थी पर्यावरण संरक्षणासाठी सज्ज होत आहेत.
अशी आहे नेट झिरो मोहिम
हवामान बदल, जागतिक तापमान वाढीचे संकट रोखायचे असेल तर हरित गृह वायूंचे उत्सर्जन थांबवावे लागेल. त्यासाठी आपापला परिसर नेट झिरो म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईडसह हरित गृह वायूंचे शून्य उत्सर्जन करणारा ठरायला हवा. जागतिक पातळीवरच ही संकल्पना राबविली जात आहे.
यांच्या सहभागाने बळ
ग्रीन तेर फाऊंडेशनच्या या चळवळीत केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, केंद्रीय शिक्षण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), एनर्जी इफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल), भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय (एआयसीटीई), द एनर्जी रिसोर्ट इन्स्टिट्यूट (टेरी), युनेस्को, एनबीए/एनआयआरएफ, असोचॅम, निती आयोग आदींनी सक्रीय सहभाग घेतला आहे.
असा होणार फायदा
विद्यापीठे व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनविले जात आहे. सौर, पवन, जलविद्युत यासह अपारंपरिक स्त्रोतांद्वारे ऊर्जा निर्मिती, ऊर्जा कार्यक्षमता, वीजेची बचत यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जात आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचा कॅम्पस प्रदूषणमुक्त केला जाईल. त्यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन, पेपरलेस कामकाज, पर्यावरणस्नेही पर्यायांचा अवलंब करण्यात येत आहे.
कार्यशाळांमधून चालना
पश्चिम भारतासाठी पुणे विद्यापीठ, ईशान्य भारतासाठी गुवाहाटीतील आयआयटी, दक्षिण भारतातील चेन्नईच्या एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि उत्तर भारतासाठी दिल्ली विद्यापीठ येथे कार्यशाळा झाली. त्यात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच, आगामी काळात करावयाच्या कृतीसंदर्भातील रोडमॅपही निश्चित करण्यात आला आहे.
तज्ज्ञ मान्यवर म्हणतात
तरुणांचा देश अशी भारताची ओळख आहे. हेच तरुण आपल्या कृतीतून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी सज्ज झाले आहेत. नेट झिरो मोहिमेतून यापुढील काळात अतिशय महत्त्वपूर्ण कार्य घडणार आहे. जागतिक इतिहासात त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. राजेंद्र शेंडे, संस्थापक संचालक, ग्रीन तेर फाऊंडेशन
अभिमानाची बाब
भारत देशाला नेट झिरो करण्याचे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये नेट झिरो ही मोहिम राबवून तरुणांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच, ते प्रत्यक्ष कृतीसाठी तयार होत आहेत. ही अतिशय आनंद आणि अभिमानाची बाब आहे.
प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री
भारताचा आदर्श इतरांनीही घ्यावा.
नेट झिरो ही मोहिम जगभरात राबविली जात आहे. मात्र, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ती राबविणारा भारत हा एकमेव आणि मोठा देश आहे. भारताचा आदर्श इतरांनीही घ्यावा. भारतीय तरुण नक्कीच मैलाचा दगड तयार करतील, अशी आशा आहे.
इरिक सोल्हेम, पर्यावरण तज्ज्ञ