इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः रेल्वेत ट्रॅक मेंटेनर असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याने केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने त्याला अटक केली. ‘सीबीआय’च्या पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मल्लिनाथ भीमाशंकर नोल्ला (रा.चिंचवड)याला अटक केली आहे.
मल्लिनाथ रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागात ट्रॅक मेंटेनर होता. खडकी स्थानकातून गेल्या वर्षी तो निवृत्त झाला. त्याने २००८ ते २००३ दरम्यान मोठ्या प्रमाणावर स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. पुणे आणि पिंपरी, चिंचवडमध्ये स्वत:च्या, कुटुंबीयांच्या आणि नातेवाइकांच्या नावाने त्याने मालमत्ता खरेदी केल्या. त्याने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवली. त्याच्याकडे सहा फ्लॅट, सहा दुचाकी आणि चारचाकी वाहने, मोकळे भूखंड, जमीन, इमारती आहेत. त्याच्या वेतन आणि संपत्तीत मोठी तफावत आहे. त्याची गुंतवणूकही मोठी आहे.
मल्लिनाथ याला दोन पत्नी आहेत. त्याच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला एका वर्षासाठी तडीपार केले होते. मल्लिनाथ याने दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जमवली आहे. त्याचा मुलगा, मुलगी आणि सुनेकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. रेल्वेतील एका साध्या ट्रॅकमनकडे एवढी मोठी संपत्ती असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ही संपत्ती त्याने कशी जमवली, याचा तपास आता सीबीआय करीत आहेत.