इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्ली मद्य धोरण प्रकरणी चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली. त्यांना आज पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, ‘ईडी’ने केलेल्या अटकेविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या कोर्टातून अर्ज माघारी घेण्यात आला. आता लोअर कोर्टमध्ये केजरीवाल आपला पक्ष ठेवणार आहे. सुप्रीम कोर्टाने जर निर्णय विरोधात दिला तर पुन्हा अपील कऱण्याची संधी मिळणार नाही. म्हणून केजरीवाल यांच्या लीगल टीमने एेनवेळी आपली रणनिती बदलल्याचे बोलले जात आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना पदावर असताना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. चौकशीच्या निमित्ताने केजरीवाल यांना ‘ईडी’ अटक करण्याची भीती ‘आप’ व्यक्त करीत होता. केजरीवाल यांना अटक झाली असली, तरी ते दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे ‘आप’ने म्हटले आहे.
दरम्यान, ‘आप’ने आज दिल्लीत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी रात्रीही पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘आप’च्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या घराबाहेर ‘आप’चे नेतेही निदर्शने करताना दिसले. तत्पूर्वी ‘ईडी’च्या अतिरिक्त संचालकाच्या नेतृत्वाखाली एजन्सीचे १० सदस्यीय पथक सिव्हिल लाइन्समधील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि झडती घेतली. ‘ईडी’चे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर दोन तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
आता न्यायाललयात हजर केल्यानंतर त्यावेळेस कोर्ट काय निर्णय देईल यावर केजरीवाल पुढचे पाऊल उचलणार आहे.