नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुका 2024 निष्पक्ष वातावरणात व्हाव्यात यासाठी भारतीय निवडणूक आयोग विविध प्रकारची पावले उचलत आहे. निवडणूक आयोगाने आज गुजरात, पंजाब, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या चार राज्यात असंवर्गातील जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले. संबंधित जिल्ह्यातील जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक ही पदे अनुक्रमे भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवेतल्या अधिकाऱ्यांसाठी आहेत.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.याखेरीज आयोगाने पंजाबमधल्या भटिंडा इथले वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि आसाममधल्या सोनितपूर इथले वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांची निवडून आलेल्या राजकीय प्रतिनिधींसोबतचे नातेसंबंध किंवा कौटुंबिक संबंध या पार्श्वभूमीवर बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षपात किंवा कोणासोबत हातमिळवणी अशा कुठल्याही प्रकारच्या शंका प्रशासनाबाबत राहू नयेत यासाठी खबरदारी म्हणून या दोन जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
निदेशक तत्त्वांनुसार सर्व संबंधित राज्य सरकारांना, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक/ वरिष्ठ पोलीस अधीक्षक या पदांवर असंवर्गातील अधिकारी असल्यास त्यांच्या तात्काळ बदल्या करण्याच्या आणि याबाबतचा अनुपालन अहवाल आयोगाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.