नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नाशिक जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून सुमारे ३१ हजार मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ चे कलम २६ अन्वये जिल्हाधिकारी यांना जिल्हा मतदान अधिकारी / कर्मचारी नेमणुकीचे अधिकार आहेत. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी हे कलम १५९ अन्वये शासकीय कर्मचारी यांच्या सेवा विविध निवडणूक कामकाजासाठी वर्ग करून त्यांना निवडणुकीचे कामकाज सोपवित असतात.
प्रशासन निवडणुकीची पूर्वतयारी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान एक वर्ष आधीपासूनच करत असते. निवडणूक कामकाजासाठी मनुष्यबळाची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. त्यादृष्टीने निवडणूक कामकाजासाठी मनुष्यबळ व्यवस्थापन हे जिल्हा प्रशासनासाठी आव्हान असते. अचूक मनुष्यबळाची निवड, त्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून अधिकारी-कर्मचारी यांची माहिती मागविणे, आयोगाच्या सॅाफ्टवेअरमध्ये डाटा एंट्री करणे, मतदान अधिकारी, कर्मचारी यांची सरमिसळ ( Randomization) करणे, नेमणुकीचे आदेश तयार करणे, मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करणे, प्रशिक्षणात विविध महत्वाच्या बाबी, नियम, कायदे याबाबत मार्गदर्शन करणे, हस्तपुस्तिका देणे, मतदान यंत्रांचा सराव करून घेणे इत्यादी बाबी जिल्हा प्रशासनाकडून हाताळल्या जातात.
मतदान केंद्रांवरील अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी पॉवर पॅाइंट प्रेझेंटेशन आणि स्लाईड शो याद्वारे विविध तपशील समजावून सांगण्यात येतो. प्रशिक्षणात निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य, फॅार्म्सचे विहित नमुने, पाकिटे, हस्तपुस्तिका, दिशानिर्देशांचा संच इत्यादी बाबींची सखोल तयारी करून घेण्यात येते. मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचारी पथके यांना पोहोचविणे, परत आणणे, यासाठी मतदान केंद्रानुसार मार्गाचे आराखडा तयार करणे, अधिकारी आणि कर्मचारी संख्या आणि मतदान केंद्रांचे क्षेत्र यानुसार वाहनांचे नियोजन या बाबी प्रशासनाकडून लक्षात घेवून नियोजन करण्यात येते. यासाठी देखील मोठ्या प्रमाणात सहायकारी कर्मचारी यांची आवश्यकता असते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात एकूण 4 हजार 800 मतदान केंद्रे आहेत. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष 6 हजार 770 , मतदान अधिकारी क्र. 1 करिता 6 हजार 820 तर मतदान अधिकारी क्र. 2 व 3 करिता 16 हजार 947 अधिकारी – कर्मचारी यांचा डाटा जिल्हा प्रशासनाने संकलित केला आहे. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रावर एक शिपाई कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या लोकेशनवर ( साधारण 3 ते 4 मतदान केंद्र संख्या) एक पाळणाघर देण्यात येणार असून या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
तसेच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लावणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणेकामी सहाय्य करणे, व्हील चेअरसाठी मदत करणे यासाठी एनसीसी/ एनएसएस/ स्काऊट-गाईडचे विद्यार्थी यांची मदत घेण्यात येईल. आयोगाच्या निर्देशानुसार संवेदनशील मतदान केंद्रावर एक सूक्ष्म निरीक्षक देखील राहणार आहे.
निवडणुकीसाठी पोलिस विभाग देखील सज्ज असुन प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी यांची नेमणूक असेल. तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाची विविध भरारी पथके, स्थिर पथके, शीघ्र कृती दल, राखीव पोलिस दल, पोलिस आयुक्त नाशिक शहर आणि पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे नियंत्रणाखाली कार्यरत राहतील. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.