इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : सण-उत्सव सुरू होत नाही तोच वीज मंडळाने दरवाढ करत ग्राहकांना शॉक दिला आहे. वाढलेल्या दरांमुळे आर्थिक बोझा बसणार असून याचा फटका मासिक बजेटला बसणार आहे.
पितृपक्ष संपून नुकतीच नवरात्रीला सुरुवात झाली आहे. येथून पुढे सणांची रेलचेल राहणार आहे. अशात विद्युत विभागाने ग्राहकांची गोची केली आहे. सणासुदीच्या काळात महावितरणने इंधन समायोजन शुल्क आकारून पुन्हा वीज महाग करीत ग्राहकांना मोठा ‘शॉक’ दिला आहे. कंपनीच्या नवीन आदेशानुसार, घरगुती ग्राहकांना सप्टेंबरच्या बिलासाठी प्रति युनिट ३५ पैसे जास्त द्यावे लागतील. कंपनीच्या अकार्यक्षमतेचा फटका आता सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.
महावितरणचे मुख्य अभियंता (वीज खरेदी) यांनी जारी केलेल्या या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनी सप्टेंबरमध्ये वापरलेल्या विजेवर इंधन समायोजन शुल्क वसूल करीत आहे. ही वसुली येत्या काही महिन्यांत सुरूच राहणार आहे. कंपनीच्या आदेशाचा परिणाम बीपीएल श्रेणीतील ग्राहकांवरही होणार आहे. यासोबतच कृषी जोडणीसाठी प्रति युनिट १० आणि १५ पैसे तसेच उद्योगांना प्रति युनिट २० पैसे जास्त द्यावे लागतील. महावितरणला मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात अल्पकालीन करार आणि पॉवर एक्सचेंजद्वारे १३४० दशलक्ष युनिट अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली.
असे आकारण्यात येतील दर
बीपीएलसाठी ५ रुपये प्रतियुनिट, १ ते १०० युनिटसाठी १५ रुपये, १०१ ते ३०० युनिटसाठी २५ रुपये, ३०१ ते ५०० युनिटसाठी ३५ रुपये, ५००हून अधिक युनिटसाठी ३५ रुपये दर आकारण्यात येणार आहे.