इंडिया दर्पण वृत्तसेवा
पुणे -जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने आज पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा येथे पर्यावरण पूरक पर्यटन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पुढाकार घेऊन देशभरातील एकंदर १०८ ऐतिहासिक वारसा स्थळांवर या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पुण्यातील या कार्यक्रमाला पर्यटन मंत्रालयाच्या मुंबई कार्यालयातील सूचना अधिकारी स्वाती बारसोडे यांच्यासह राज्य पर्यटन विभागाचे अधिकारी आणि पुण्यातील विविध शिक्षण संस्था मधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . काही पर्यटक संस्थांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात आवर्जून सहभागी झाले होते.
पर्यटन क्षेत्रातील हरित गुंतवणुकीला आज सर्वाधिक महत्व प्राप्त झाले असून पर्यटनाला जाताना पर्यटकांनी पर्यावरणाचे भान राखण्याचे आवाहन करणारी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. कोणत्याही पर्यटनस्थळी स्वतः कचरा न करण्याबरोबरच इतरांना देखील त्यासाठी प्रवूत्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची सूचना या कार्यक्रमाद्वारे करण्यात आली आणि शनिवारवाडा परिसरात स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात आली.
सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात मोठ्या संख्येने गणेशभक्त आणि पर्यटक दाखल झाले असून शनिवार वाड्यावरील या कार्यक्रमासाठी देखील त्यांची उपस्थिती लाभली होती.