नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील वेगवेगळया भागात भरदिवसा झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पचवटी व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तारवाला नगर येथील प्रशांत गोपीचंद ठाकरे (रा.चैतन्यपर बंगला,लोखंडे मळा,ओमकारनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठाकरे कुटुंबिंय बुधवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे व देवघरातील चांदीचे देव तसेच एक मोबाईल असा सुमारे ३ लाख ३ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार नांदुर्डीकर करीत आहेत.
दुसरी घटना पाथर्डी शिवारातील गौळाणेरोड भागात घडली. हरिश ज्ञानेश्वर लोणे (रा.सप्तशृंगी रो हाऊस,सेंट थॉमस बेथनी शाळेजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. लोणे कुटूंबिय मंगळवारी (दि.१९) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे,वजन काटा,मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ४९ हजार १५० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.