नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी कर्नाटक राज्यातील व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील हा पहिलाच उमेदवारी अर्ज ठरला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात निवडणुका होणार असून येथे उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे.
व्यंकटेश्वर महास्वामी यांनी भाजपकडे सोलापूर जिल्ह्यातून उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नागपूरमधून अर्ज भरला आहे. कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांनी महाराष्ट्रातील पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
व्यंकटेश्वर महास्वामी यांची संपत्ती केवळ नऊ रुपये असून ४५ हजार रुपयांचे आपल्यावर कर्ज असल्याचा उल्लेख त्यांच्या उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे महाराज चर्चेत आले होते.