नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वित्तीय वर्षाचे शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेची कोषागार शाखा, नाशिक रोड व देवळाली कॅम्प शाखा तसेच तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या उपकोषागार शासकीय व्यवहारास प्राधिकृत केलेल्या स्टेट बँकेची शाखा व बँक ऑफ बडोदाची सुरगाणा शाखा रविवार, ३१ मार्च २०२४ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम क्रमांक ४०९ अन्वये निर्गमित केले आहेत.
शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांना वित्तीय वर्ष अखेरच्या दिवशी उशिरापर्यंत प्राप्त झालेले अनुदान खर्ची टाकून जिल्हा कोषागार व तालुका उपकोषागार कार्यालयाकडून वितरीत होणारी देयके व धनादेश शासकीय व्यवहार होणाऱ्या बँकेत वटवून रक्कम काढणे व शासनाकडे महसुली उत्पन्नाच्या रकमा भरणा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने वर नमूद स्टेट बँक शाखांसह बँक ऑफ बडोदा, सुरगाणा शाखा ३१ मार्च २०२४ रोजी उशिरा रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.