सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या आठवड्यांमध्ये एटीएम फोडण्याचा प्रकार मुसळगाव एमआयडीसी येथे घडलेला होता. तसेच तेथील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा तपास सिन्नर एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत असताना दोघांना अटक केली असून दोन जण फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
१३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मुसळगाव परिसरातील रॅक्यु रेमीडीस प्रा.लि. या औषधांची पावडर तयार करणा-या कंपनीचे सिक्युरीटी गार्डला अज्ञात ४ आरोपींनी चाकु व कोयत्याचा धाक दाखवून, मारहाण दमदाटी करून कंपनीचे ऑफिसमधील सी. सी.टी.व्ही. कॅमेराचे डी.व्ही.आर., मॉनिटर, वस्तु लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट घेवून सिक्युरीटी गार्डला दोरीने बांधून कपंनीचे आवारातील पार्क केलेली कपंनीची व्हेरिटो कार जबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती.
त्याच दिवशी पहाटे सदर चोरीच्या कारमधून या आरोपींनी मुसळगाव एमआयडीसी परिसरातील सारस्वत को-ऑपरेटीव्ह बँकेचे एटीएम मध्ये प्रवेश करून सिक्युरीटी गार्डला कोयत्याचा धाक दाखवून, मशिनला पट्ट्या सारखा दोर बांधून, एटीएम मशिन सदर कारने बाहेर ओढून सिक्युरीटी गार्डला रूममध्ये कोंडून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. सदर एटीएम मशिनमध्ये सुमारे १४ लाख रूपये रोख रक्कम होती. सदर दोन्ही घटनांबाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे येथे प्रमाणे जबरी लुटमारीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्हयात आरोपीनी चोरून नेलेली चॉकलेटी रंगाची महिंद्रा व्हेरिटो कार क. MH-15-EP-6567 ही घटनास्थळापासून काही अंतरावर बेवारस स्थितीत मिळून आली होती.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांनी वरील घटनांचे अनूषंगाने सविस्तर माहिती घेवून एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हे उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांची पथके सदर गुन्हयांचा संयुक्त तपास करत होते. सदर गुन्हयातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत, गुन्हयातील साक्षीदारांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून स्थागुशाचे व मुसळगाव एमआयडीसी पोलीसांना यांना गोपनीय माहिती मिळाली, सराईत गुन्हेगार प्रविण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर, रा. शहा, ता. सिन्नर त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी सिन्नर पोलीसांनी मुसळगाव परिसरातून खालील आरोपींना ताब्यात घेतले आहे
स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीसांनी मुसळगाव परिसरातून संशयित आरोपी गोरख लक्ष्मण सोनवणे (२८) व सुदर्शन शिवाजी ढोकणे (२८) दोघेही रा. मुसळगाव यांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यावर त्यांनी भैय्या कांदळकर व एक विधीसंघर्षीत यांच्यासह कार चोरी व एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता व मोबाईल जप्त केला आहे. आरोपींना पुढील तपासकामी एमआयडीसी पोलीसांच्या हवाली करण्यात आले आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी कांदळकर याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर, उपनिरीक्षक किशोर पाटील, गुन्हे शाखेचे अंमलदार विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गरूड, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, विक्रम टिळे, प्रशांत सहाणे यांच्या पथकाने दोन्ही गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे.