नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील बुटेश्वर शिवारात आज संध्याकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा यात मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली. तेजस व मानव गणेश आहेर अशी या दोन्ही मुलांची नाव आहेत.
दुपारच्या सुमारास शाळेतून घरी परत आल्यावर घरातील सर्व जण कांदा काढणीच्या कामात व्यस्त असतांना दोन्ही भावंड शेतात गेली. येथे जवळच्या डोंगरावरुन काही वानरांची टोळी शेतात आली असता त्यांना हुसकावण्याच्या नादात दोन्ही भाऊ त्यांच्या मागे धावले. त्यानंतर डोंगर उतारावर असलेल्या एका शेततळ्यात असलेले पाणी पाहायला गेले.
मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने लहान भाऊ मानव याने त्याला वाचविण्यासाठी हात दिला. त्यावेळेस तोही घसरल्याने तो ही तळ्यात पडला. त्यांच्या सोबत असलेल्या लहान बहिणीने ही घटना पाहताच तीने ही घटना सर्वांना सांगितली. त्यानंतर सर्वच जण मदतीसाठी धावले. शेततळे अर्धे भरलेले असल्याने दुर्दैवाने त्यात दोघांचा मृत्यू झाला.