नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक – पुणे मार्गावरील चिंचोली फाटा भागात नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरेकेटींग तोडत खसगी लक्झरी बस शिरल्याची घटना घडली. मद्याच्या नशेत चालकाचा ताबा सुटल्याने हा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित चालकास पोलीसांनी अटक केली आहे.
चंद्रकांत दुधाभाई सोळंकी (३९ रा.सुरत गुजरात ) असे खासगी बस चालकाचे नाव आहे. नाशिकरोड पोलीसांच्या वतीने नाशिक पुणे मार्गावरील चिचोली फाटा भागात सोमवारी (दि.१८) रात्री नाकाबंदी करण्यात आली. हॉटेल शेतकरी समोर पोलीस येणा-या जाणा-या वाहनाचीं तपासणी करीत असतांना रात्री नऊच्या सुमारास पुण्याकडून नाशिकच्या दिशेने येणारी भरधाव लक्झरी बस एआर ०६ सी २२४४ पोलीसांच्या नाकाबंदीत शिरली. बंदोबस्तावरील पोलीसांनी गांभीर्य ओळखून पळ काढल्याने सुदैवाने कुठलीही दुर्घना घडली नाही.
मात्र या घटनेत वाहन तपासणी साठी लावण्यात आलेल्या बॅरेकेटींगचे नुकसान झाले आहे. पोलीसांनी चालकास ताब्यात घेतले असता तो मद्याच्या नशेत आढळून आला. प्रवाशांच्या जीवितास धोका होईल अशा पध्दतीने तो बेदारक वाहन चालवित होता. याप्रकरणी अंमलदार प्रमोद ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी संपत्तीस हाणी पोहचविण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.