इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक रोख्यांबाबत भाजपवर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल यांनी याला सर्वात मोठे खंडणी रॅकेट म्हटले होते. यावर शाह म्हणाले, की राहुल गांधींनाही निवडणूक रौख्यांद्वारे १६०० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांनी ते कोठून गोळा केले ते सांगावे.
शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक रोख्यांबाबतच्या निर्णयाचा आदर केला. ते म्हणाले. की निवडणुकीतील काळ्या पैशाचा प्रभाव कमी करण्यासाठी ते आणण्यात आले होते. त्यात यश आले होते. काँग्रेसला निवडणूक रोख्यांतून मिळालेल्या निवडणुकीच्या देणग्यांचा संदर्भ देत केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “गांधींनाही सोळाशे कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांनी ही ‘हफ्ता रिकव्हरी’ कुठून मिळवली हे त्यांनी सांगावे. आम्ही म्हणतो ही पारदर्शक देणगी आहे; पण ते खंडणी आहे असे म्हणत असतील, तर त्यांनी ही खंडणी कुठून आणली हे सांगावे.
भारतीय जनता पक्ष निवडणूक देणगीदारांची यादी जाहीर करेल का, असे विचारले असता, गृहमंत्र्यांनी सांगितले, की ‘इंडिया आघाडी’ आपले तोंड दाखवू शकणार नाही. राहुल यांच्या अहंकारी आघाडीला मिळालेल्या सहा हजार कोटी रुपयांचा हिशोब द्यावा. जेव्हा निवडणूक रोख्यांची सर्व माहिती बाहेर येईल, तेव्हा ‘इंडिया’ आघाडी तोंड दाखवू शकणार नाही. भाजपला भरपूर देणग्या मिळाल्या हे खोटे आहे. आम्हाला सहा हजार दोनशे कोटी रुपये मिळाले, तर राहुल यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीला सहा हजार दोनशे कोटीं रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे. आमच्याकडे ३०३ खासदार आहेत. १७ राज्यांत आमची सरकारे आहेत’ पण ‘इंडिया’ आघाडीकडे किती जागा आहेत?