नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एक दोन नव्हे तर तब्बल ८८ वर्षाहुन अधिक वर्षाची परंपरा असलेले सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उन्हाळ्याच्या सुट्टीत घेण्यात येणारे सैनिकी प्रशिक्षण शिबीर(एसएमटीसी) आणि व्यक्तीमत्व विकास शिबीर(पीडीसी) हे एप्रिल-मे मध्ये येण्यात येणार आहे. संस्थेच्या भोसला मिलिटरी कॉलेज येथे मुलींसाठी तर भोसला मिलिटरी स्कूलमध्ये मुलांसाठी हे शिबीर होत असते. साहस,संस्कार आणि व्यक्तीमत्व विकासाचे उत्तम व्यासपीठ म्हणून याकडे बघितले जात असून आतापर्यत देशस्तरावर विद्यार्थ्यांच्या अनेक संस्कारक्षम पिढ्या संस्थेने घडविल्या आहेत.
समाजात वीरवृत्ती जागृत व्हावी, सरंक्षणक्षमता व व्यवस्थितपणा यावा यासाठी लष्करी शिक्षणाचा आग्रह दूरदृष्टी असणारे द्रष्टे नेते डॉ.बा.शि.मुंजे यांनी धरला. लष्करीकरणाच्यासंदर्भात अत्यंत सखोल, सर्वांगीण व मूलगामी अभ्यासाचे प्रतिबिंब हे भोसला
च्या या शिबीरातून उमटत असल्याचे आज पहायला मिळत आहे उन्हाळ्यातील सैनिकी प्रशिक्षण शिबीर हे १५ ते २१ वयोगटातील मुलामुलींसाठी तर १२ ते १४ वयोगटातील मुलांमुलींसाठी व्यक्तीमत्व विकास शिबीर घेतले जाते. यंदाही कॉलेज स्कूलच्यास्तरावर या शिबीराचे नियोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाद्वारे शिस्तबध्द कवायती,कसरतीचा प्रयत्न
या शिबीरात प्रामुख्याने ड्रिल, योग, शारीरीक शिक्षण, फायरिंग जलतरण,घोडेस्वारीबरोबरच आत्मसंरंक्षण, आपत्ती व्यवस्थापणाचे धडे दिले जातात. शारीरिक क्षमता आणि समन्वय यांच्या सहाय्याने शारीरिक व मानसिक जीवनशैलीला एक शिस्तबद्ध आकार देण्याचा प्रयत्न शिबीरातून होतो. आत्मविश्वास, धैर्य, सर्जनशील विचारप्रणाली आणि नेतृत्व गुण विकसित करत असतांना जबाबदार नागरिक होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी जीवनाचा मार्ग म्हणून शिस्त स्वीकारावी यासाठी सैनिकी प्रशिक्षण दिले जाते.
परंपरेचा वारसा जपणारे अनेकजण
रामदंडीच्या अनेक पिढ्या या शिबीरातून तयार झाल्या आहेत. आजी, पणजोबा, आई, वडील, मावशी, काका असे सारेच जण या शिबिरात सहभागी झाले होते म्हणून आपणही या शिबिरात सहभागी झालेच पाहिजे,असा निश्चय करणारे अनेकजण आहेत. त्यातूनच प्रेरणा घेऊन सैन्यात अधिकारी व अन्य पदावर गेलेल्यांची संख्या सुध्दा मोठी आहे. प्रत्येकजण सैन्यात जाईलच असे नाही. पोलीस, प्रशासकीय, खेळ अशा विविध सेवांमध्ये रामदंडींचा सहभाग उल्लेखनीय आहे. रामभूमी परिसरात घालवलेले पंधरा दिवस किंवा महिना हा आयुष्यभराचा ठेवा असतो. अनेक गोष्टीमध्ये आपल्या क्षमता ओळखायला विद्यार्थी लागतात. वेगवेगळ्या भाषा असणारे, राज्यात वावरणारे विद्यार्थी सहजपणे एकत्र राहतात. घट्ट मैत्री होते. अधिक माहितीसाठी भोसला मिलिटरी कॉलेज फोन ०२५३- २३९०९६१०-१२,मो.९४२३५७७५१२, भोसला मिलिटरी स्कूल २३०९६०८ २३०९६०५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.