नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदूरनाका भागात व्यावसायीक स्पर्धेतून दोघांनी एका रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत दगड फेकून मारल्याने रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिजवान कादीर शेख (रा.आगरटाकळी) या जखमी रिक्षाचालकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शेख मंगळवारी (दि.१९) नांदूरनाका बस थांबा भागात प्रवासी रिक्षात बसवित असतांना ही हाणामारी झाली. रिक्षात प्रवासी बसवित असतांना उपस्थीत दोघा रिक्षाचालकांनी त्यांना गाठले. दोघांनी प्रवाश्यांशी जबरदस्ती करतो या गैरसमजातून रिक्षाचालक शेख यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली.
याप्रसंगी संतप्त एकाने जमिनीवरील दगड उचलून शेख यांना फेकून मारल्याने त्यांचे डोके फुटले असून दुस-याने रिक्षास लाथ मारून नुकसान केले आहे. अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.