नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केलेल्या कारवाईत मॅफेड्रोन हा अमली पदार्थ विक्रेता पोलीसांच्या हाती लागला असून, त्याच्या ताब्यातून सुमारे सुमारे ५८ हजार १७० रूपये किमतीचा व १९.३९ ग्रॅम वजनाचे एमडी अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई सामनगाव रोडवरील अश्विनी कॉलनी भागात करण्यात आली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण चंदू चव्हाण (२३ रा.अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. युनिटचे अंमलदार विशाल कुंवर व समाधआन वाजे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सामनगाव परिसरातील इसम एमडी या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी गि-हाईक शोधत असून तो सोमवारी (दि.१८) अश्विनी कॉलनी भागात येणार असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती. त्यानुसार युनिटचे वरिष्ठ निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला असता संशयित पोलीसांच्या जाळयात अडकला.
संशयित एमडीचे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणा-या वजनकाट्यासह पोलीसांच्या हाती लागला असून त्याच्या ताब्यातून सुमारे १९.३९ ग्रॅम वजनाचे व ५८,१७० किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, जमादार विवेक पाठक, हवालदार मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे,समाधान वाजे,विशाल कुवर,महेश खांडबहाले,तेजस मते, संजय सानप,प्रकाश महाजन,चंद्रकांत गवळी,मधुकर साबळे,अतुल पाटील,संजय पोटींदे,जितेंद्र वजीरे,रोहित आहिरे,प्रविण मोरे आदींच्या पथकाने केली.