इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : काँग्रेस नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे आमदार विकास ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. एकमेकांचे पक्षांतर्गत विरोधक असलेले काँग्रेसचे तीन दिग्गज नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत एकत्र आले. त्यानतंर त्यांनी बैठक घेत ठाकरे यांचे नाव निश्चित केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसने या ठिकाणी तगडा उमेदवार देऊन गडकरी यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. नागपूरमध्ये हे नाव निश्चित झाल्यामुळे हे नाव आता पक्षश्रेष्ठींकडे पाठवले जाणार आहे.
नागपूरमधून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी विकास ठाकरे, अभिजित वंजारी, प्रफुल्ल गुडधे यांची नावे आघाडीवर होते. माजी खासदार राम हेडाऊ यांचे पूत्र संजय हेडाऊ यांचेही नाव चर्चेत होते. पण, आ. विकास ठाकरे यांचे नाव निश्चित करण्यात आले. या ठिकाणी कुणबी किंवा ओबीसी उमेदवार दिला जाण्याची चर्चा होती. गेल्या दोन निवडणुकीत मोदी लाट असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराने तीन लाखाहून अधिक मते घेतली होती. या ठिकाणी काँग्रेस चांगली लढत देऊ शकते.
काँग्रेसची विदर्भात मोठी ताकद असतानाही पक्षांतर्गत वादामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूरमधील काँग्रेसचे नेते एकमेकांचे तोंडही पाहत नव्हते. पण, आज विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत हे एकत्र आले. त्यानंतर आ. विकास ठाकरे यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या बैठकीत माजी मंत्री सुनील केदार गैरहजर होते. केदार गटाकडून प्रफुल्ल गुडधे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. त्यामुळे ठाकरेंच्या नावाला केदार गटाकडून विरोध होण्याची शक्यता आहे.