इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे राजकारणात खळबळ निर्माण झाली असून आरोप – प्रत्यारोपाची फैरी सुरु झाल्या आहे. या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी येरवडा येथे पोलिसांची असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा आरोप केला आहे.
२०१० मधील हे प्रकरण थेट १३ वर्षानंतर पुस्तकामुळे चर्चेत आले आहे. या पुस्तकात अजित पवार यांचे थेट नाव घेतले नसले तरी जिल्ह्यातील दादा मंत्री म्हणून त्यात म्हटले आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय व घर होणार होते. पण, ही जागा खासगी बिल्डरला दिली असा उल्लेख केला आहे. यात पुढे असेही म्हटले आहे की, पोलिसांची सरकारी जागा खासगी व्यक्तीला दिली तर आपल्या प्रतिमेस धक्का बसेल म्हणून या व्यवहारला विरोध केला होता. परंतु माझे ऐकले गेले नाही आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण करण्यात आला.
हे आरोप समोर आल्यानंतर अजित पवार यांनी या आरोपीचे लगेच खंडण करत ते फेटाळून लावले. जमिनींचा लिलाव करण्याबाबत जिल्ह्याच्या मंत्र्यांना कोणतेही अधिकार नाहीत. लिलावात सरकारी जमिनी विकता येत नाहीत. महसूल विभागामार्फत जाणाऱ्या विनंतीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली तरच सरकारी जमिनींचा लिलाव होतो.