इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर भाजपला दाखवतील. मी ज्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत उतरेल, तेव्हा खऱ्या अर्थाने रंगत येईल असा दावा करताना वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला.
माध्यमांशी बोलताना मोरे म्हणाले, ‘आजपासून निवडणुकीला ५५ दिवस आहेत. मी रिंगणात उतरल्यानंतर निवडणूक कशी एकतर्फी होते हे पाहू. माझी वेळ चुकलेली नाही. मी वेळ घेत असलो, तरी योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिंकण्यासाठी लढायचे असेल तर योग्य ट्रॅकवर असावे लागते. मी योग्य ट्रॅकवरच असून त्यात नक्की यशस्वी होईन.
राजकीय वाटचालीसंदर्भात लोकांचे मत विचारात घेत असलो, तरी लोक बऱ्याचदा काही पर्याय सुचवतात; पण ते निवडताना पुण्याचे हीत लक्षात घेऊन पावले टाकत आहोत, असे सांगून ते म्हणाले, की उमेदवारी मिळावी यासाठी मी सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. मला निश्चित उमेदवारी मिळेल. माझ्यासमोर मुरलीधर मोहोळ असले, तरी मीच विजयी होईल. आयुष्यात जेव्हा संघर्षाला सामोरे जाण्याची वेळ आली, तेव्हा मोठा विजय प्राप्त केला आहे. ही निवडणुक माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणार आहे. त्यामुळे मी यातून नक्कीच मार्ग काढील आणि विजयी होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.