नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ध्रुवनगर भागात कारागृहातील गप्पा गोष्टीवरून चेष्टा केली या रागातून दोघा भावांनी एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत ३० वर्षीय तरूण जखमी झाला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर राजपूर व पवन उर्फ ति-या (रा.दोघे शिवाजीनगर) अशी तरूणावर चाकू हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत रोशन सुभाष बरू (रा.संभाजीनगर,सातपूर) या जखमीच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बरू व सागर चिंचोरे हे दोघे मित्र रविवारी (दि.१७) रात्री सत्यम वाईन या दुकानाजवळ बसून गप्पा मारत असतांना तेथे पवन उर्फ ति-या नामक तरूण आला. तिघांमध्ये कारागृहातील गप्पा सुरू असतांना बरू याने ति-या याची चेष्टा केली. त्यामुळे संतप्त ति-याने आपल्या राजपूत नामक भावाशी मोबाईलवर संपर्क साधून बोलावून घेतल्याने ही घटना घडली.
दोघा भावांनी बरू यास शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी एकाने धारदार चाकूने त्याच्या पोटावर वार करून तुझ्याकडे नंतर बघून घेतो असा दम दिला. अधिक तपास पोलीस नाईक हिंडे करीत आहेत.