नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महिंद्रा फायनान्स कंपनीच्या दोघा कर्मचा-यांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या स्कार्पिओ वाहनाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल जगताप व अक्षय देवरे अशी वाहनाचा अपहार करणा-या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्स कंपनीच्या सिडको कार्यालयातील संशयित कर्मचा-यांची नावे आहेत. याबाबत सुनिता रामदास मांडे (रा.शांतीनगर,निफाड) यांनी फिर्याद दिली आहे. मांडे यांच्या मृत पतीच्या नावे असलेली स्कार्पिओ एमएच १५ एचवाय २५९६ वाहन फायनान्स कंपनीच्या दोघा अधिका-यांनी गेल्या वर्षी २३ फेब्रुवारी रोजी विश्वासाने ताब्यात घेतले होते. हा प्रकार मांडे यांचे भाऊ शशिकांत गायधनी (रा.शिंदे पळसे) यांच्या समक्ष घडला होता.
संशयितांनी विश्वासात घेवून लेखी हमीपत्रावर साक्षरी करण्यास भाग पाडून वाहन कंपनीच्या गोडावून मध्ये जमा करीत असल्याचे सांगितले होते. यावेळी वाहन जमाची तसेच विक्री केल्यास त्याबाबतची आणि लोन निल केल्याबाबत एनओसी देण्याची ग्वाही देण्यात आली होती. त्यामुळे मांडे यांनी आपले सुमारे १७ लाख रूपये किमतीचे वाहन संशयिताच्या स्वाधिन केले होते. मात्र वर्ष उलटूनही एनओसी न मिळाल्याने त्यांनी चौकशी केली असता दोघांनी त्यांचा विश्वास घात केल्याचे समोर आले अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.