इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मनसे असणार असल्याचे बोलले जात होते. आता त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार्टड विमानाने सोमवारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत गेल्यानंतर मनसेने दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीनपैकी किमान दोन लोकसभा मिळाव्या असा आग्रह धरला आहे. या तीनही दक्षिण मुंबईची एक जागा मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्यासाठी देण्याची भाजपने तयारी दर्शवली आहे. तर दुसरी कोणती जागा मनसेला कोणती मिळते हे बघणे आता औत्सुक्याचे असणार आहे. त्यात नाशिकच्या जागेवर मनसेचा जोर आहे.
या सर्व घडामोडीत मात्र नाशिकमध्ये भाजप व शिंदे गटाची धडधड वाढली आहे. महायुतीमध्ये मनसेचा समावेश झाला तर ते किमान दोन जागा मागू शकतात ही शक्यता होती. त्यात मनसेने तेच केले आहे. अगोदरच नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. त्यात आता मनसेची भर पडणार आहे.
दक्षिण मुंबईत मनसे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. येथे बाळा नांदगावकर यांना उभे केले जाणार आहे. पण, मनसे नाशिकची जागा चिन्हावर लढण्यासाठी मागू शकतात. नाशिकवर राज ठाकरे यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे ते या जागेवर दावा करु शकतात. असे झाले तर तिघांचे भांडण व चौथ्याला लाभ असे होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. आता त्या अंतिम टप्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यात या दोन जागेवर शिक्कामोर्तब शक्यता आहे.