इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूरः माढा लोकसभा मतदारसंघात अगोदर मोहिते पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत नाराजी व्यक्त केली. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून सोमवारी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या गटाने शक्तीप्रदर्शन करून मोहिते पाटलांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपने विद्यमान खा, रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील गट नाराज झाला असून त्यांना विरोध केला आहे. त्याच्या या विरोधाला आता जशास तसे उत्तर निंबाळकर गट देत आहे. त्यामुळे माढ्यातील हा वाद शमवणे भाजपसाठी सोपे राहिलेला नाही.
खा. निंबाळकर यांनी टेंभुर्णी येथील आमदार संजय शिंदे यांच्या फार्म हाऊसवर सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीला सहापैकी पाच आमदार उपस्थित होते. त्याचबरोबर मोहिते पाटील यांच्या सर्व विरोधकांनीही या बैठकीस हजेरी लावल्याने मोहिते विरुद्ध निंबाळकर हा वाद आता रंगला आहे.
दुसरीकडे मोहिते समर्थकांनी गेल्या पाच दिवसापासून ‘सोशल मीडिया’त पवारांची तुतारी घेऊन माढा निंबाळकर याना पाडा असे मेसेज व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. आता भाजपपुढे मोहिते यांना उमेदवारी देऊन बाकीच्या पाच आमदारांना नाराज करायचे, की निंबाळकर यांना दिलेली उमेदवारी कायम ठेवून मोहिते पाटील यांची समजूत घालायची हा पेच आहे. आता तो कसा सोडवला जातो हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.