इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये एका पोलिस हवालदाराने शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनावर बहिष्कार टाकला. जिल्ह्यातील सर्व आंतर महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शिक्षकांनी आरोपी हवालदारावर एनएसए लावण्याची, सरकारी नोकरी आणि मृताच्या कुटुंबाला १० कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोलिसाने अटक केली आहे.
उत्तर प्रदेश बोर्ड हायस्कूल परीक्षेचे पेपर घेऊन शिक्षक व पोलिसांची टीम वाराणसीहून मुझफ्फरनगरला एकाच गाडीत आले होते. परीक्षेचे पेपर इतर जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये जमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. ज्यामध्ये शिक्षक धर्मेंद्र कुमार, संतोष कुमार आणि पोलीस पथकात उपनिरीक्षक नागेंद्र चौहान, मुख्य हवालदार चंद्र प्रकाश यांच्यासह दोन कर्मचारी जितेंद्र मौर्य आणि कृष्णा प्रताप यांचा समावेश होता. प्रयागराज, शाहजहांपूर, पिलीभीत, मुरादाबाद आणि बिजनौरमध्ये पेपर दिल्यानंतर ही टीम रविवारी रात्री उशिरा मुझफ्फरनगरच्या सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या एसडी इंटर कॉलेजमध्ये पोहोचली. मात्र कॉलेजचं गेट बंद असल्याने ही टीम रात्री गाडीतच विश्रांती घेत होती.
यावेळी टीममधील कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश याने शिक्षक धर्मेंद्र कुमार यांच्याकडे तंबाखूची मागणी केली. त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या चंद्रप्रकाशने तंबाखू न दिल्याने शिक्षक धर्मेंद्र यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये शिक्षक धर्मेंद्र अनेक गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले होते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिक पोलिसांनी जखमी शिक्षकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान डॉक्टरांनी शिक्षकाला मृत घोषित केले.