नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात राज्यातून बसमधून अवैधरित्या होणारी मद्याची तस्करी रोखण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी निवडणुक आयोग, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये संपूर्ण नाशिक जिल्हयात कारवाई करण्यात येत आहे. त्यात मोठी तस्करी पकडण्यात आली आहे.
जिल्हयातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी जिल्हयाचे सीमावर्ती भागांमधील चेकपोस्टवर सतर्क नाकाबंदी लावून अवैध कारवायांना प्रतिबंध घालण्यात येत आहेत. त्यानुसार सोमवारी गुजरात राज्य परिवहन महामंडळ (GSRTC), नाशिक सुरत बस क्र. GJ-18-Z-8970 या बसमधून मद्याची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकराजु सुर्वे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक ते सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचून गुजरात राज्यात जात असलेली वरील बस थांबवत तपासणी केली असता, त्यामध्ये रूपये १ लाख १४ हजार ६३५ रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा विनापरवाना अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आलेला आहे.
या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाणे येथे गुरनं १३८/२०२४ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयात विजय विनोद बलसार, वय ५२ वर्षे, रा. सुरत (बस चालक), अमृतभाई भुवनभाई पटेल, वय ५६ वर्षे, रा. सुरत (बस कन्डक्टर) सदर गुन्हयात पुढील तपासात किस्मत ब्रँण्डीं शॉप, पंचवटी, नाशिक याचे मालक तसेच अवैध मद्यसाठयाच्या वाहतुकीस मदत करणारे इसमांना आरोपी करण्यात आले आहे.
सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक, आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रामणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोहवा प्रविण सानप, किशोर खराटे, पोकॉ जाधव, बोडके, मोरे यांचे पथकाने केली आहे.