नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गहाण ठेवलेल्या दहाचाकी डम्परची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पाच टक्के व्याजदराने घेतलेल्या मुद्दलीची परतफेड करूनही डम्पर विक्री करण्यात आली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन अशोक शिंदे (रा.माडसांगवी ता.जि.नाशिक), मुंजीच नजीर (रा.पनवेल जि.रायगड) व राम कुंडलिक जितेकर (रा.दापोली पारेगाव ता.पनवेल रायगड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत ऋषिकेश दत्तात्रेय आहेर (रा.सदाशिव कॉम्प्लेक्स आडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आहेर यांना २०२२ मध्ये अडचण असल्याने त्यांनी आपल्या मालकीचा एमएच १५ इजी ९९३६ हा डंम्पर संशयित शिंदे यांच्याकडे गहाण ठेवला होता. मे महिन्यात यापोटी ४ लाख २० हजार रूपये त्यांनी पाच टक्के व्याज दराने घेतले होते.
मात्र व्याजासह मुद्दलीची परतफेड करूनही संशयिताने नजीर याच्या माध्यमातून जितेकर यास डम्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंदे व नजीर या दोघांनी मिळून आरटीओत सादर केलेले पेपर खरे असल्याचे भासवून जितेकर याने या वाहनाची परस्पर विक्री केली. पोलीसांनी दाद न दिल्याने याबाबत तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.