संजय देवधर, नाशिक
गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष यानिमित्ताने दरवर्षी गंगाघाटावर सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदा राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे. पाडवा पटांगण ( जुना भाजी बाजार ) येथे गोदावरी तीरावर दि.५ ते ८ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात सहा हजार चौरस फुटांची महारांगोळी, महावादन, अंतर्नाद, युद्धकला प्रात्यक्षिक, शोभायात्रा असे विविध कार्यक्रम होतील. यानिमित्ताने महारांगोळी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व सुप्रसिध्द रांगोळी कलाकार नीलेश देशपांडे यांच्याशी केलेली बातचीत…
यंदाच्या महारांगोळीचे वेगळेपण म्हणजे ती तृणधान्य वापरुन साकारण्यात येणार आहे. नीलेश यांच्या नेतृत्वाखाली आरती गरुड, सुजाता कापुरे, मयुरी शुक्ला व १०० सहकारी महिला ७५ फूट लांब व ७५ फूट रुंद आकारात रांगोळी रेखाटतील. यात वापरलेली तृणधान्ये नंतर स्वच्छ करून गरजूंना देण्यात येतील. रांगोळी हे भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य. मूळ ६४ कलाप्रकारांमध्ये गणना होते, इतका जुना हा कलाप्रकार आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांत आजही रांगोळीची समृध्द परंपरा टिकून आहे. या कलाप्रकाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून रांगोळी रेखाटण्यात नीलेश देशपांडे यांनी संस्कारभारतीच्या माध्यमातून अखंड योगदान दिले आहे. रांगोळी परंपरेचे ते जतन, संवर्धन करत आहेत. मांगल्य आणि सौंदर्य याचं प्रतीक म्हणजे रांगोळी. भारतात यज्ञसंस्थेचा जन्म झाला, तेव्हापासून रांगोळीची परंपरा आहे. तेव्हा तिला रांगोळी असं संबोधन नसलं, तरी यज्ञाभोवती रांगोळी काढली जायची. तिसर्या शतकात पौष्कर संहितेमध्ये लिखित स्वरूपात प्रत्यक्ष रांगोळीचे नाही, पण मंडलांचे (पद्मोदर) उल्लेख आढळतात. यज्ञ, बिंब, कुंभ आणि मंडल अशा चार मार्गांपैकी मंडलपूजा आज तितकीशी प्रचलित नसली, तरी त्यातल्या भद्र आणि स्वस्ति या कल्याणकारी रचनांमधूनच रांगोळी विकसित होत गेली.
सन ११३०च्या सुमारास राजा सोमेश्वराने प्रथम रांगोळीविषयी लिहिलं आहे. त्याच्या मते विद्ध, अविद्ध, भाव असे चित्रांचे तीन प्रकार पडतात. नारदसंहितेमध्ये चित्रांचे तीन प्रकार म्हटले आहेत. भौम्य – भूमीवरचा, कुड्यक – भिंतीवरचा आणि ऊर्ध्वक – छतावरचा. त्यातली भौम्य म्हणजे भूमीवरची चित्रकला. त्यामध्ये रांगोळी येते. रांगोळीचे रसचित्र आणि धूलिचित्र असे दोन प्रकार सांगितले आहेत. बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ हा जो सगळा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे, तिथे तांदूळ भिजत घालून त्याची बारीक पूड करून काडीला कापूस लावून रांगोळ्या काढल्या जातात. या टिकतातही खूप आणि अलंकारिक पद्धतीने काढताही येतात. प. बंगालमधली अल्पना, केरळची कोलम हे त्यातले अनेकांना माहीत असणारे प्रकार. धूलिचित्राच्या स्वरूपात रांगोळी कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या पश्चिम किनारपट्टीच्या भागात काढली जाते. या रांगोळीत प्रतीकात्मकता जास्त आहे. मूळ प्रकार हे दोनच. फुलापानांच्या, रंगीत मिठाच्या वा अन्य साधनांपासून जी रांगोळी काढली जाते, ते सगळे आधुनिक प्रकार. पाण्यावर व पाण्याखाली देखील रांगोळी काढली जाते. देवापुढे, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढण्याची परंपरा गावपातळीवर आजही बर्यापैकी टिकून आहे. शहरांमधूनही सणासुदीला, काही समारंभाच्या निमित्ताने रांगोळी काढली जाते.
चैत्र महिन्यात काढलं जाणारं चैत्रांगण हे एक वैशिष्ट्य. तेराव्या शतकात, महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रामध्ये चैत्रांगणाचा उल्लेख आढळतो. मराठी साहित्यातलं पहिलं लिखित वाङ्मय म्हणूनही त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहेच. घराचं अंगण शेणाने नीट सारवलेलं असतं. या सारवण्याने जमिनीला जो खरखरीतपणा येतो, त्यातून काही नकारात्मक कंपनं तयार होतात, ती नाहीशी करण्यासाठी रांगोळी घालावी, असा लीळाचरित्रात उल्लेख आहे. चैत्रांगणात ६४ प्रतीकांचा अंतर्भाव असतो. या रांगोळीची सुरुवात बिंदूपासून होते, ज्याला आपण ठिपका म्हणतो. ठिपका म्हणजे ठप्प करणं, थांबवणं. दाराबाहेर काढलेली रांगोळी घरात प्रवेश करणार्या अतिथीच्या मनावर काही शुभ संस्कार करते. त्याच्या मनात जर नकारात्मक भावना असेल, तर ती रांगोळीमुळे बदलू शकते. आडवी रेषा ही पृथ्वीरेषा समजली जाते. ती निसर्गदत्त रेषा आहे. उभी रेषा ही आकाश रेषा आहे. ‘तुम्ही काही पेरलं तर उगवेल’ असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. स्वस्तिक हे गतिमानतेचं प्रतीक आहे. उलट स्वस्तिक हे नकारात्मक ऊर्जा नाहीशी करणारं समजलं जातं. म्हणून ते सुलट्या स्वस्तिकाबरोबर आवर्जून काढलं जातं. गोपद्म हे रांगोळीतलं महत्त्वाचं शुभचिन्ह आहे. आईनंतर गाय असं मानणारी आपली संस्कृती आहे. गायीचं माणसाच्या आयुष्यातलं महत्त्व, तिची उपयुक्तता याविषयीची कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करण्यासाठी गोपद्मांना चैत्रांगणात स्थान दिलं आहे. अशी सुरेख रांगोळी सण, समारंभात अग्रस्थानी असते.
महारांगोळीतून समजेल तृणधान्यांचे महत्त्व
यंदा केंद्र सरकारने श्रीअन्न ( मिलेट्स ) वर्ष जाहीर केले आहे. म्हणून यावर्षी तृणधान्ये वापरून महारांगोळी संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण ३००० किलो तृणधान्ये वापरली जातील. बाजरी, ज्वारी, नाचणी, कुटकी, काबु, पोन्नी, वरई, राळा, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा या धान्यांचा समावेश असेल. त्यांचाही सर्वसामान्यांना परिचय होईल व महत्त्व समजेल. १०० रांगोळी कलाकार महिला ३ तासात रांगोळी पूर्ण करतील. तीन दिवस नाशिककरांना ही महारांगोळी बघता येणार आहे. नंतर शुभदा जगदाळे व सहकारी महिला या धान्यांची स्वच्छता करुन अनाथ बालकांना, वृध्दाश्रम व गरजूंना पोहोचवतील.
संजय देवधर
(वरिष्ठ पत्रकार व कला समीक्षक )
९४२२२७२७५५