इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकलूजः महायुतीमध्ये भाजपने उमेदवारी केल्यानंतर काही ठिकाणी नाराजी नाट्य सुरु झाले आहे. आता या नाराजी नाट्यातून नेते कसा मार्ग काढता हे महत्त्वाचे आहे. भाजपकडून माढ्यात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आल्याने धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी थेट एक बैठक घेऊन महायुतीच्या नेत्यांची झोप उडवली. त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी संकटमोचक गिरीश महाजन अकलूजमध्ये आले. पण, त्यांनाही मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवून घोषणाबाजी केली. महाजन यांचा रस्ता कार्यकर्त्यांनी अडवला. धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्यानंतर त्यानंतर महाजन यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून वरीष्ठांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
या नाराजी नाट्यानंतर मोहिते पाटील आणि महाजन यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली. त्यात त्यांनी मोहिते यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण, ही चर्चा सुरु असतांना निवासस्थानी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जवळपास दोन तास राडा सुरू होता. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘माढा आणि निंबाळकरांना पाडा’ अशी घोषणाबाजी केली. शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणी कार्यकर्ते मोहिते पाटील यांना सुचवत आग्रह केला.
महाजन यांनी मोहिते पाटील यांची नाराजी, राग परवडणारा नाही, अजून बराच वेळ आहे, ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालू. वरिष्ठ निर्णय घेतील, असे सांगत हात जोडून आणि गाडीवर उभे राहून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, या कार्यकर्त्यांचा राग काही गेला नाही.