नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- निफाड़ येथे .विंग कमांडर ( रिटा ) प्रदीप बागमार यांनी त्यांच्या २० एकर जागेत भव्य असे गोल्फ कोर्स (मैदान) तयार केले आहे. रिव्हर साईड गोल्फ कोर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गोल्फ कोर्सवर आयोजित दोन दिवसीय खुल्या गटाच्या आर. एस. जी. सी. गोल्फ कप – २०२४ स्पर्धेची आज यशस्वी सांगता झाली.
भारतीय गोल्फ युनियनच्या मार्गदर्शनाखाली आणि गोल्फ असोसिएशन, जिल्हा नासिक यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुषांसाठी अमॅचुअर गट, नवोदितांसाठी (Novice) गट, तर महिलांसाठी अमॅचुअर गट आणि मुलांना संधी मिळावी यासाठी मुलांसाठी वेगळा गट ठेवण्यात आला होता. या चार गटात स्पर्धां खेळविल्या गेल्या.
या संर्धेत मुंबई ,पुणे, नवी मुंबई चेन्नई येथील खेळाडूंसह डिफेन्स फोर्स येथील खेळाडूं,आणि मुलांचाही समावेश होता. गेले दोंन दिवस खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या अमॅच्यूअर गटात ७० स्ट्रोक्समध्ये १८ होल्स पूर्ण करण्याच्या या प्रकारात पनवेलच्या कर्नल महिंद्र शिरसाठ यांनीं सुंदर खेळाचे प्रदर्शन करून केवळ ६४ स्ट्रोक्स मध्ये आपला खेळ पूर्ण करून या गटाचे विजेतेपद मिळविले. या गटात कर्नल ए. के. यादव यांनी आपला खेळ ७० स्ट्रोक्स मध्ये पूर्ण करून उपविजेतेपद मिळविले. नवोदित (Novice ) गटात मिलिंद महागवत याने आपला खेळ ७८ स्ट्रोक्स मध्ये पूर्ण करून या गटाचे विजेतेपद पटकावले. या गटात गौरी भागवत ( ७९ स्ट्रोक्स) हिने उपविजेतेपद तर पुष्पलता गौतम ( ९० स्ट्रोक्स) यांनी तिसरा क्रमांक मिळविला. मुलांच्या (Childrans) गटात ३५ स्ट्रोक्स मध्ये नऊ होल्स पूर्ण करण्याच्या स्पर्धेत पनवेलच्या इशांत शिकरे याने आपला खेळ ४३ स्ट्रोक्स मध्ये पूर्ण करून या गटाचे विजेतेपद मिळविले. तर स्वरूप गायकवाड याने ४७ स्ट्रोकमध्ये आपला खेळ पूर्ण करून उपविजेपेपद मिळविले.
याचबरोबर लॉगेस्ट ड्राईव्ह या प्रकारात अमॅच्यूअर गटात हरप्रीत सिंग यांनी सर्वात जास्त लांब म्हणजे ४०३ यार्ड लांब बॉल मारून या प्रकारात पहिला क्रमांक मिळविला. या स्पर्धेबरोबर कॅडीज साठी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राजू अहिरराव याने प्रथम, राकेश भोलाचरण याने दुसरा तर प्रवीण आढाव याने तिसरा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत विजेते ठरलेल्या खेळाडूंना एकलहरे रोड, नाशिकरोड येथील ट्रॅक्शन मोटर वर्क्स, इरींन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील भारतीय रेल्वे इंस्टीट्युट ऑफ इंजिनीरिंगचे महानिदेशक राहुल गौतम यांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौवरण्यात आले. यावेळी बोलतांना महानिदेशक राहुल गौतम यांनी सांगितले की विंग कमांडर प्रदीप बागमार यांनीं निफाड येथे गोल्फ या खेळासाठी सर्व सुविधा युक्त असे गोल्फ कोर्से तयार केले आहे. याचा लाभ जास्तीत जास्त गोल्फ खेळाडूंनी घ्यावा असे आवहान केले आणि या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या स्पर्धेचे आयोजक तथा रिव्हर साईड गोल्फ कोर्सेचे संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव तथा प्रशिक्षक नितीन हिंगमिरे यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नितीन हिंगमिरे, मनीष शहा ,आशिष केरोसिया आणि सहकारी यांनी दोन दिवस अथक परिश्रम घेतले.