नागपुर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वात महायुती येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत ४०० हून अधिक जागा जिंकणार आहे. देशात सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेले दुसरे राज्य महाराष्ट्र असून ४८ जागांमधील एक जागा नागपूरची आहे. तसेच देशातील लोकप्रिय केंद्रिय मंत्री तसेच राज्याचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांना नागपुरची उमेद्वारी देण्यात आली आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी गडकरींचा प्रचार पूर्ण ताकीदीने करणार, असा विश्वास ‘पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केला. राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात ‘पीरिपा’चे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी नागपुरात नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तिसऱ्यांदा नागपूर लोकसभेची उमेदवारी नितीन गडकरींना मिळाल्याबद्दल ‘पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाड़े यांनी नितिन गडकरी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, नागपूर शहर अध्यक्ष कैलास बोंबले, युवक शहर अध्यक्ष सोहेल खान, स्वप्निल महल्ले, प्रकाश मेश्राम, बाबा बोरकर, बाळू भंडारे, करण बागडे, विक्की बनकर, अमित यादव, सुमित डोंगरे, हिमांशू मेंढे, आयुष दहिवले, महावीर पाल, कुशिनारा सोमकुवर, महेंद्र नागदिवे, भिमराव कलमकर, अजय चव्हाण, शैलेन्द्र भोंगाडे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे जयदीप कवाडेंनी सांगितले की, ‘पीरिपा’ घटक पक्ष हा संपूर्णपणे महायुतीसोबत राज्यातील सर्वच उमेदवारांच्या प्रचार करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदीना पुन्हा सत्तेची चावी मिळवून द्यायची आहे. राज्यातील रिपब्लिकन, बहुजन, वंचित तसेच आंबेडकरवादी प्रामाणिक मतदात्यांचा विश्वास आतापर्यंत ‘पीरिपा’सोबत राहिला आहेच. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या मतदारांची दीक्षाभूल करण्याचे काम जरी महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्नांना हाणून पाडण्यास ‘पीरिपा’ पूर्ण पणे सक्षम आहे. शहराचे लाडके खासदार असलेले नितीन गडकरींची विजयाची हॅट्ट्रीक मिळवून देण्यासाठी महायुती पूर्ण पणे सज्ज आहे. त्यांना मिळालेल्या उमेदवारीला ‘पीरिपा’चा पूर्ण पाठिंबा असून ते जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वासही जयदीप कवाडे यांनी व्यक्त केला.