नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली तर महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे योगदान सामाजिक क्रांतीत अतिशय मोठ असून जगातील हे अतिशय महत्वाचं दाम्पत्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मु.शं.औरंगाबादकर सभागृह, नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते डॉ. कैलास कमोद लिखित ‘फुलला माळ्याचा मळा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रा.रावसाहेब कसबे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, डॉ.कैलास कमोद यांच्या पत्नी मंगला कमोद,माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष प्रकाशक विजय राऊत,डॉ.सुधीर संकलेचा, ऍड.हिरेन कमोद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांचे सैन्य घेऊन लढले. ते सर्व बलुतेदार वर्गातील होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये माळी समाजातील मावळ्यांनी देखील मोलाचं योगदान दिलं. त्यामध्ये खेसाजी गायकवाड, प्रताप अधिकारी, कृष्णाजी अधिकारी, बालाजी अधिकारी,बाबाजी विठोबा अधिकारी,चाफाजी टिळेकर यांचे दाखले त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले की, डॉ. कैलास कमोद यांनी आपल्या संशोधनपर अभ्यासातून माळी समाजाचा इतिहास उलगाडला आहे. खरतर माळी समजविषयी हे पुस्तक म्हणजे ‘इन्सायल्कोपीडियाच’ आहे. डॉ.कैलास कमोद पुस्तक लिहिताना समाजातील बारकाव्यांचा अभ्यास केलेला आहे. अगदी महाभारत काळापासून ते आजपर्यन्त माळी समाजाची वाटचाल त्यांचा समग्र इतिहासाचा पट यामध्यमातून मांडला आहे. सर्व समाजासाठी हा इतिहास अतिशय महत्वाचा आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मावळे, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, नारायम मेघाजी लोखंडे यांच्यापासून ते आजवर विविध क्षेत्रात माळी समाजातील नामवंत, किर्तीवंत व्यक्तींचा आढावा यातून मांडला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भारतात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणारी पहिली महिला माळी होती. डॉ. आनंदीबाई जोशी या इंग्लंडहून पहिल्या डॉक्टर बनून भारतात आल्या. इंग्लंडहून येताच त्यांचे निधन झाल्याने त्या डॉक्टरकीची प्रक्टिस करू शकल्या नव्हत्या. अशा काळात आपण एक गोष्ट दुर्लक्षित करतो, ती म्हणजे माळी या बहुजन समाजामध्ये रखमाबाई राऊत या ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वूमेन’ येथून डॉक्टर होऊन भारतात परतल्या. खडतर वैवाहिक जीवन, घटस्फोट आणि त्यांची वैद्यकीय सेवा हे मुळातूनच अत्यंत प्रेरणादायी असून, वाचण्यासारखं आहे.
असे अनेक प्रसंग आणि इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. त्यामुळे हे पुस्तक अधिक वाचनीय आणि संग्रही ठेवावे असे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, डॉ. कैलास कमोद यांनी आजवर माझं नाशिक, डिस्कवरी ऑफ नाशिक, गुडबाय डायबिटीस, वन मिनिट बायोग्राफी, गुन गुना रहे हैं भँवरे ही पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यातील गुडबाय डायबिटीस हे पुस्तक अधिक गाजल असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच प्रा.हरी नरके यांनी उणीव आपल्याला भासत असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, देशात ओबीसींची संख्या ही ५४ टक्क्यांहून अधिक आहे. आजही हा समाज विकासापासून वंचित आहे. माळी समाजात अनेक पोट जाती असून त्यांनी माळी म्हणून एका छताखाली पुढं आपलं पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे म्हणाले की, फुलला माळ्याचा मळा हे पुस्तक माळी समाजावर पीएचडी करण्यासाठी विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा देईल. आपला इतिहास हा त्याच समाजातील व्यक्तीला लिहावा लागतो ते इतर लिहीत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच संगीत हे आपल्या जीवनाला आत्मभान देत आणि जगण्याला शिकवते असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी जाती व्यवस्था ही नष्ट व्हायला हवी असं परखड मत यावेळी व्यक्त केलं. यावेळी डॉ.कैलास कमोद यांनी पुस्तकाचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. प्रकाशक विजय राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. हिरेन कमोद यांनी केले.