पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोअर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स (ई एम ई) ने १४ ऑक्टोबर रोजी, आपला ८१ वा स्थापना दिवस साजरा केला. या कार्यक्रमादरम्यान, पद्मश्री पुरस्कार विजेते, क्रीडापटू मुरलीकांत राजाराम पेटकर, क्राफ्ट्समन (निवृत्त) यांचा त्यांच्या अदम्य कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
पेटकर यांचे जीवन म्हणजे एक विलक्षण अशी कथा आहे. जी प्रचंड विश्वास आणि कठोर जिद्दीची कहाणी आहे. त्यांनी आपल्या तरुणपणीच महाराष्ट्राच्या ग्रामीण कुस्तीच्या आखाड्यातून पुढे येत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. ते भारताचे पहिले पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेते असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १३ सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर ३४ सुवर्ण, आणि राज्य स्तरावर तब्बल ४० सुवर्णपदकांसह आपल्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत ठेवला आणि विलक्षण अशी कामगिरी ते करत राहिले. टोकियो येथे मुष्टीयुद्ध स्पर्धेत (बॉक्सिंगमध्ये) भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांचा विविध खेळाची मैदाने गाजवण्याचा प्रवास सुरू झाला.
यानंतर,१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांच्या अंगावर बंदुकीच्या गोळ्या लागून अनेक जखमा झाल्या, परंतु आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी १९७२ च्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. याआधी त्यांना राज्य सरकारचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते, वर्ष २०१८ मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांना त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांची ही यशोगाथा, लवकरच कार्तिक आर्यन अभिनीत ‘चंदू चॅम्पियन’ या अनोख्या अशा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात चित्रित केली जाणार आहे, जी त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीला आणखी अधोरेखित करते.
लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह , अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, सदर्न कमांड यांनी वैयक्तिकरित्या पेटकर यांचा स्नेहभावे सन्मान केला.”वीरांच्या शोधात असलेल्या जगात, पेटकरांसारख्या दिग्गज, सन्माननीय व्यक्तीच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा आम्हाला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार अजय कुमार सिंह यांनी काढले. पेटकर यांचे जीवन समर्पण, प्रकट जिद्द आणि धैर्य यांचे प्रतीक आहे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाची सांगता, प्रत्यक्ष पेटकर यांनी आपल्या शौर्य आणि विजयाच्या कथा सांगून केली. ८१ व्या ईएमई कोअर डे निमित्ताने तांत्रिक उत्कृष्टतेचा गौरव करण्याबरोबरच वास्तविक जीवनातील नायक आणि त्यांचे राष्ट्रासाठी प्रेरणादायी योगदान साजरे झाले.