मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजय मिळवला आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात स्मृती मंधानाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हा विजय मिळवला आहे. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ १८.३ षटकात सर्वबाद ११३ धावा केल्या. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हे आव्हान सहज गाठलं. सोफी डिव्हाईन आणि स्मृती मंधाना या जोडीने सावध सुरुवात करून दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून श्रेयंका पाटील, सोफी मोलिनेक्स आणि आशा सोभना यांनी कमाल केली. श्रेयंका पाटीलने ३.३ षटकात १२ धावा देत ४ गडी बाद केले. सोफी मोलिनेक्सने ४ षटकात २० धावा देत ३ गडी बाद केले. तर आशा सोभनाने ३ षटकात १४ धावा देत २ गडी बाद केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रेंचायसीला 16 वर्षानंतर स्पर्धेत जेतेपद मिळालं आहे. आयपीएलमध्ये अजूनही फ्रेंचायसीची झोळी रिती आहे. पण वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरलं आहे.
स्मृती मंधानाने टी२० च्या तुलनेत सर्वात धीमी फलंदाजी केली. ३९ चेंडूत ३१ धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेस्ट ७९.३९ इतका राहीला. जेव्हा फटकेबाजी करून झटपट धावा करण्याची वेळ होती तेव्हा डॉट बॉलने प्रेशर वाढवलं. १५ षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रेशर कमी करण्यासाठी स्मृतीने मिन्नू मनीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला. मात्र अरुंधती रेड्डीने जराही चूक न करता झेल पकडला. यामुळे अंतिम क्षणी प्रेशर आणखी वाढलं. एलिस पेरीने शेवटपर्यंत तग धरला आणि शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून सोफी डिव्हाईने २७ चेंडूत २५ धावा केल्या. तर एलिस पेरी नाबाद ३४ आणि रिचा घोषने नाबाद १७ धावा केल्या.