नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा समाजाच्या काही तरुणांनी नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडली. एका विवाह समारंभासाठी आलेल्या आ. कल्याणकर यांची गाडी अर्धापूर तालुक्यातील देवाग कुराडा या गावात काही तरुणांनी फोडली. यावेळी काही तरुणांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या.
कल्याणकर यांच्या चालकाने त्यांची कार कार्यक्रम स्थळाजवळ पार्क केली होती. काही वेळातच त्यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला. त्यांच्या कारची मागची काच फुटली. काही युवकांनी आमदारांच्या कारची काच फोडल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणाव झाला. काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कोणी दगडफेक केली, हे समजू शकले नाही.
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरेच्या अमलबजावणीवर मराठा समाज ठाम असून शासन कुठलाच निर्णय घेत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातील काही तरुणांनी आ. कल्याणकर यांची गाडी फोडली.