नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन कारमधील रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला. पंचवटी परिसरात ही घटनां शुक्रवारी घडली. सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असून याप्रकरणी पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शालिमार परिसरात राहणारे राजेंद्र अंबादास आहेर (रा. पटेल कॉलनी, शिवाजीरोड) हे शुक्रवारी निमाणी बसस्थानक भागात गेले होते. पांजरापोळ येथील नागशेटीया पशू खाद्य दुकनासमोर त्यांनी आपली इनोव्हा कार पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचा दरवाजा उघडून हॅण्ड बॅग चोरून नेली.
या बॅगेत १८ हजाराची रोकड होती. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार काकड करीत आहेत. दुसरी घटना तपोवनातील स्वामी नारायण मंदिर परिसरात घडली. माया सुधाकरराव सोनेकर (रा.नागपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनेकर कुटुंबिय गुरूवारी (दि.१४) देवदर्शनासाठी शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास सोनेकर कुटुंबिय तपोवनात देवदर्शन घेत असतांना ही घटना घडली.
स्वामी नारायण मंदिरासमोर तवेरा वाहन पार्क करून कुटुंबिय मंदिरात गेले असता अज्ञात चोरट्याने कशाने तरी चारचाकीचा दरवाजा उघडून पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे ९६ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राजोळे करीत आहेत.