मुबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मुंबई दाखल झाली. त्याचे जोरदार स्वागत झाले. आता या यात्रेचा समारोप रविवारी होणार आहे. मुंबईत या समारोपात इंडिया आघाडीचे नेते शिवतीर्थावर मोठी शक्तीप्रदर्शन करणार आहे. या समारोप यात्रेला इंडिया आघाडीचे बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून आपली ताकद दाखवून देणार आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर हे सुध्दा उपस्थितीत राहणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूरच्या इम्फाळमधून सुरु झाली. १६ राज्य ११० जिल्हे व ६७०० किलोमीटरचे अंतर पार करुन मुंबईत यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. या यात्रेतून युवा न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय व भागिदारी न्याय असे पाच न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत.
शनिवारी आघाडीची पत्रकार परिषद झाली. त्यात शिवसेना खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.