मुबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेस संबोधित करताना जयराम रमेश म्हणाले की, इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपाने कोट्यवधी रुपयांचे खंडणी गोळा केली. भाजपचा अजेंडा होता, चंदा दो, धंदा लो, हप्तावसुली, कंत्राट घ्या, लाच द्या, आणि खोट्या कंपनी बनवा व चंदा द्या. परंतु भाजपाची ही खंडणी वसुली उघड झाली आहे. इलेक्टोरल बाँडमधील आणखी माहिती बाहेर येणार आहे. हा सर्व प्रकार पाहता भारतीय जनता पार्टीची आता बाँड जनता पार्टी झाली आहे.
भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूरच्या इम्फाळमधून सुरु झाली. १६ राज्य ११० जिल्हे व ६७०० किलोमीटरचे अंतर पार करुन मुंबईत यात्रेचा समारोप झाला. इलेक्टोरल बाँड मधून भाजपाला मिळालेल्या ६००० कोटी रुपयांच्या खंडणीविरोधात न्याय यात्रेच्या ६००० किमीचा सामना असा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसेल. या यात्रेतून पाच न्याय गॅरंटी दिल्या आहेत. युवा न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय व भागिदारी न्याय असे पाच न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेसची गॅरंटी व्यक्तिची नाही तर पक्षाची आहे तर मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, सर्वांना आर्थिकदृष्ट्या संपवून टाकण्याची गॅरंटी आहे असा टोला मारला.
भारत जोडो न्याय यात्रेतून २५ गॅरंटी दिल्या आहेत, फक्त गॅरंटी नाहीतर वॉरंटी सहित आहेत. मोदींची २०१४ ची गॅरंटी खोटी होती, निवडणूक जुमला होता असे भाजपाने जाहीर सांगून जनतेची फसवणूक केली. भाजपाची गॅरंटी फेकूगिरी व जुमलेबाजी असते पण काँग्रेस सत्तेत आल्यास या सर्व गॅरंटी पूर्ण केल्या जातील. असा विश्वास व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस शिवसेना खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.