इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार असून चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लोकशाहीतील मोठ्या उत्सवाला प्रारंभ झाला असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटले आहे, की लोकशाहीचा सर्वात मोठ्या उत्सव सुरू झाला आहे. निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आम्ही ‘भाजप-एनडीए’ निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत. आम्ही जनतेपर्यंत जात आहोत. येणारी पाच वर्षे हा आपल्या सामूहिक संकल्पाचा काळ असेल. त्यात आपण भारताच्या पुढील एक हजार वर्षांच्या विकास प्रवासाचा रोडमॅप तयार करू. हा काळ भारताचा सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक समृद्धी आणि जागतिक नेतृत्वाचा साक्षीदार असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
जेव्हा देशवासी म्हणतात, ‘मी मोदींचे कुटुंब आहे’, तेव्हा ते मला विकसित भारताच्या उभारणीसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करते. विकसित भारतासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करू आणि हे लक्ष्य साध्य करू. हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे, असेही आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.