नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून जळगाव जिह्यातील एकाने तरूणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड वर्ष उलटूनही नोकरीला न लावता अत्याचार सुरूच ठेवल्याने, तरूणीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने जाती वाचक शिवीगाळ केली. त्यामुळे हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश गोविंदराव झेडे (रा.टाकळी ता.चाळीसगाव ) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पिंपळनेर येथील पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता शहरात शिक्षण घेते. ऑगष्ट २०२१ मध्ये पीडितेची संशयिताशी भेट झाली होती. या भेटीत संशयिताने शासकिय – निमशासकिय कार्यालयांमध्ये मोठी ओळख असून अधिकारी कर्मचारी परिचीत असल्याची तरूणीस बतावणी केली. यानंतर राजीव गांधी भवन भागात भेटून तरूणीस नोकरी लावण्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने बळजबरीने बलात्कार केला.
सलग दीड वर्षापासून हा प्रकार सुरू होता. वेळोवेळी ठिकठिकाणी घेऊन जात त्याने युवतीवर अत्याचार केला. अलिकडच्या काळात मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या लग्नाची तयारी सुरू केलेली असतांनाच संशयिताचाही अतिरेक वाढल्याने तिने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे युवतीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक आयुक्त धुमाळ करीत आहेत.