मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) — तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच मागताना आणि ती स्वीकारताना नवी मुंबईतील बेलापूर विभाग -1 मधील सीजीएसटी आणि सीएक्सचे सहाय्यक आयुक्त आणि निरीक्षक यांना सीबीआयने आज अटक केली. तक्रारीवरून आरोपी सहाय्यक आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार एका वाहतूक कंपनीचा भागीदार असून त्याला सहायक आयुक्त, सीजीएसटी आणि सीएक्स विभाग-1, बेलापूर आयुक्तालय, नवी मुंबई यांनी जारी केलेली कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली होती. त्यानंतर तक्रारदाराने 27.12.2021 रोजी आवश्यक कागदपत्रे सादर केली. सेवाकराशी संबंधित कारणे दाखवा नोटीस निकाली काढण्यासाठी आरोपी सहाय्यक आयुक्तांनी तक्रारदाराकडून 6,00,000/- रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. वाटाघाटी नंतर आरोपी अधिकाऱ्याने 1,50,000/- रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम निरीक्षक, सीजीएसटी यांच्यामार्फत देण्याचे तक्रारदाराला सांगण्यात आले.
सीबीआयने सापळा रचून आरोपी सहाय्यक आयुक्ताच्या वतीने तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना सीजीएसटीच्या या निरीक्षकाला पकडले. या दोघांनाही सीबीआयने अटक केली आहे.आरोपी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आणि सरकारी कार्यालयाच्या ठिकाणी झडती घेण्यात येत आहेत.अटक केलेल्या आरोपींना संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.